खारगे समिती आज करणार उलटतपासणी पुणे – मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि ही जमीन खरेदी करणाऱ्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांना बुधवारी (दि. १९) मुंबईत येण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. राज्य सरकारने या गैरव्यवहार प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे यांच्या समितीसमोर दोघांची सुनावणी घेण्यात येणार आहे. याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने यावर चौकशी समिती नेमण्याचे जाहीर केले. त्यानुसार महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे व जिल्हाधिकारी यांची जितेंद्र डुडी तसेच सदस्य सचिव म्हणून सत्यनारायण बजाज यांची समिती नेमली. आता खारगे यांनी शीतल तेजवानी आणि दिग्विजयसिंह पाटील यांना बुधवारी मुंबईत पाचरण केले आहे. समितीपुढे या दोघांची सुनावणी होणार असून, त्यात हा व्यवहार नेमका कसा झाला, यात कोणी मदत केली, कुलमुखत्यारपत्र नेमके कसे झाले, मुद्रांक शुल्क सवलत घेण्यासाठी इरादा पत्र कसे सादर करण्यात आले, या सर्व बाबी समोर येण्याची शक्यता आहे.