Pune : निधी खर्चाची घाईगडबड; महापालिकेत सुरू असलेल्या कामांच्याही काढल्या निविदा

पुणे : राजकीय दबाव वापरुन प्रभागात विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी खर्ची करण्यासाठी प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांच्याही निविदा काढण्यात येत आहेत. तर, प्रत्यक्ष जागेवर नेमके कोणता विभाग काम करीत आहे. याची कोणतीही माहीती प्रशासनाकडेही नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. प्रभाग क्र. २५ मधील कस्तुरे चौक ते गंजपेठ पोलीस चौकी या रस्त्यावर पदपथाच्या कामात हा प्रकार समोर आला आहे.
काय आहे प्रकार ?
प्रभाग क्र. २५ मधील कस्तुरे चौक ते गंजपेठ पोलीस चौकी या रस्त्यावर नव्याने पदपथ टाकण्यात येत आहे. तर, काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून आधीच पदपथाचे काम सुरू आहे. असे असतानाच परिमंडळ पाच भवानी पेठकडून याच रस्त्यावर पदपथ दुरुस्ती करण्यासाठीच्या आठ लाखांच्या कामाची निविदा काढली आहे, त्याची मुदत दोन महिन्यांची आहे. त्यामुळे हे काम मार्च पूर्वी संपवायचे आहे. ही बाब लक्षात आल्यानंंतर सामाजिक कार्यकर्ते रूपेश केसेकर यांनी निविदांमध्ये देण्यात आलेल्या मोबाइक क्रमांकावर संपर्क साधला असता हे काम आपल्या आधीच्या अभियंत्याचे असल्याचे सांगत वेळ मारून नेण्यात आली.
त्यानंतर केसेकर यांनी या ठिकाणी आधीच काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून देताच ते काम कोणाचे आहे, आता आम्ही करणार आहोत असे सांगण्यात आले. त्यानंतर केसेकर यांनी महापालिकेच्या पथविभागाशी संपर्क साधला असता त्यांनीही हे काम कोण करीत आहे आम्हाला कल्पना नाही. हा रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो, असे सांंगत हात झटकण्यात आले. त्यामुळे या प्रकरणी काय गडबड आहे, याची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केसेकर यांनी केली आहे.
तुकड्यांमध्ये केली जातात कामे ?
शहरात क्षेत्रीय कार्यालये तसेच परिमंडळांकडून १० लाखांचा आतील कामांचा सपाटा लावण्यात आला आहे. एकाच रस्त्यावर कामांचे तुकडे करून छोट्या छोट्या निविदा काढण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अनेक कामे झालेली असूनही पुन्हा त्यांच्या निविदा काढण्यात येत असून मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वंय नसल्याने हा प्रकार घडत आहे.





