पुणे कॅन्टोन्मेंट सर्वांत लहान, जिल्ह्यात चिंचवड मोठा
पुणे : जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 झाली आहे. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड असून या मतदार संघात 5 लाख 85 हजार 731 मतदार आहेत. तर सर्वात लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेट असून या मतदारसंघात 2 लाख 70 हजार 974 मतदार आहेत.
दरम्यान पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वात मोठा मतदारसंघ हा हडपसर आहे. या मतदारसंघात 5 लाख 51 हजार 156 मतदार आहेत.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर मतदार यादी अधिक अचूक करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्त्यांमध्ये बदल आदी कामे करून ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नुकत्याच प्रसिद्ध मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 42 लाख 25 हजार 918 तर महिला मतदारांची संख्या 38 लाख 46 हजार 741 इतकी आहे. तर तृतीय पंथी मतदारांची संख्या 524 इतकी आहे. तसेच 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदार 26 हजार 588 इतके तर 19 ते 29 वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ही 12 लाख 39 हजार 990 इतकी आहे.