पुणे : रेल्वे विभागाकडून आज (दि. १०) पासून सुरू होणारी हडपसर-जोधपूर-हडपसर सेवा रद्द करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती व अपरिहार्य कारणास्तव ही गाडी रद्द करण्यात आली असल्याचे पुणे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या, भारत-पाकिस्तान युद्धामुळे देशाच्या सिमाभागातील राज्यांमध्ये अलर्ट असून या राज्यांमध्ये जाणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात प्रवाशांच्या मागणीनुसार हडपसर-जोधपूर-हडपसर रेल्वे सेवा दररोज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये गाडी क्र. २०४९५ जोधपूर-हडपसर एक्सप्रेस दि. १० मे तर गाडी क्र. २०४९६ हडपसर-जोधपूर एक्सप्रेस दि. ११ मे ही सेवा सुरू होणार होती. मात्र, आपत्कालीन व अपरिहार्य परिस्थितीमुळे या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, गाडी क्र. ११०७७ पुणे-जम्मू तवी एक्सप्रेस दि. ११ मे पर्यंत नवी दिल्लीपर्यंतच सेवा देण्यात येणार आहे. तर गाडी क्र. ११०७८ जम्मूतवी-पुणे एक्सप्रेस १३ मे पर्यंत दिल्ली येथून सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.