Pune : गुंठेवारींचे नकाशे महापालिकेकडून गहाळ?

पुणे : महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये २००२ पूर्वी समाविष्ट झालेल्या धायरी सारख्या गावांमधील गुंठेवारीची मान्यता दिलेले मूळ नकाशे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रुमच्या अनागोंदी काराभारामुळे गहाळ झाले आहेत. त्यातच, हे रेकाॅर्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविताना त्याच्या नोंदी न ठेवल्याने हे रेकाॅर्डच आता सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, अनेक नागरिकांना आता या गुठेंवारीच्या सत्यप्रतींसाठी महापालिकेत हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. या कागदपत्रांसाठी नागरिकांना बांधकाम विभाग, परिमंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागत असून या नागरिकांना रेकाॅर्ड रूम मधून तुम्हीच कागदपत्रे शोधून आणा असा सल्ला देत माघारी पाठवले जात आहे. प्रामुख्याने धायरी भागातील सोसायटयांची कागदपत्रे गायब आहेत.
काय आहे प्रकरण ?
२००२ पूर्वी महानगरपालिका हद्दीत धायरी, कात्रज, वडगाव, वारजेसह काही गावांचा समावेश झाला. महानगरपालिकेच्या मुख्य सभेने ठराव करून या गावांमधील अनेक बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिली. सुरुवातीला महापालिकेत गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या, ग्रामपंचायतींच्या दप्तरांकडून संबंधित इमारतींचे नकाशे व निर्मितीकरण दाखले, आदी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले. ही महत्त्वाची कागदपत्रे त्या त्या गावाच्या वाॅर्ड ऑफिसकडे, नंतर टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयासारख्या ठिकाणी जमा केली गेली. पुन्हा काही निर्णय होऊन नाना वाडा येथील रेकॉर्ड रुम मध्ये त्यांचे संकलन केले गेले.
बांधकाम व्यावसायिकांनी सर्व फ्लॅट विकले गेल्यावर रहिवासी सोसायट्या स्थापन झाल्या. या सोसायट्या आणि नागरिकांना बॅंक कर्जप्रकरणांसाठी व पुढे मानीव हस्तांतरणसाठी (कन्व्हेयन्स डीड) मूळ नकाशाच्या व नियमितिकरणाच्या सत्यप्रतीची आवश्यकता असून, गेल्या २५ वर्षांमध्ये काही प्रकरणांची मूळ कागदपत्रे पालिकेकडून रेकाॅर्ड स्थलांतरीत करताना गहाळ झाली आहेत. त्यामुळे आता नागरिक वाॅर्ड ऑफिस, क्षेत्रीय कार्यालये, नाना वाडा रेकॉर्ड रुम, सावरकर भवन, महापालिका मुख्य कार्यालय असे हेलपाटे घालत आहेत.
नागरिकांची झाली कोंडी
महापालिकेकडून एक प्रत आपल्याकडे ठेवत एक प्रत तत्कालीन बांधकाम व्यावसायिकांकडे देण्यात आली. त्यानंतर काही सोसायटयांनी ही प्रत बांधकाम व्यावसायिकांकडून मिळविली, तर, काही सोसायटयांनी या कागदपत्रांच्या सत्यप्रतीच्या झेराॅक्स घेतल्या. त्यानंतर आता पुन्हा अनेक नागरिकांना वैयक्तिक कर्ज प्रकरणांमध्ये, कन्व्हेयन्स डीड, मुलांचे शिक्षण तसेच वैयक्तिक कर्जासाठी गुठेवांरीच्या या मुळ प्रतीची सत्यप्रत आवश्यक आहे. त्यामुळे अनेक नागरिक, सोसायटी पदाधिकारी सत्यप्रतींसाठी महापालिकेत हेपलाटे घालत असले तरी या प्रतीच मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मला माझ्या मुलांंच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे आहे. त्यासाठी मला घर तारण ठेवायचे आहे. मात्र, गुठेंवारीची कागदपत्र नसल्याने मला कर्ज नाकारले जात आहे. त्यातच, आमच्या सोसायटीकडेही ही कागदपत्रे नाहीत. तर ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे ती होती त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे असलेली झेराॅक्स प्रत घेऊन आम्ही सत्यप्रतीची महापालिकेकडे मागणी केली. मात्र, रेकाॅर्ड सापडत नसल्याचे सांगत आम्हाला वारंवार माघारी पाठवले जात आहे.
– एक तक्रारदार ( धायरी)





