शिक्रापूर -कोंढापुरी (ता. शिरुर) येथील हॉटेल मालक हॉटेलसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेलेला असताना हॉटेल कामगाराने मालकाच्या दुचाकीसह हॉटेलमधील रक्कम, घरातील मोबाइल तसेच इतर साहित्य घेऊन पोबारा केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे (रा. वडगाव कोलांटी, जि. औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
कोंढापुरी येथे अविष्कार शिंदे यांचे शिंदे सरकार नावाचे हॉटेल आहे. तेथे गणेश जिगे हा कामगार कामाला असून अविष्कार शिंदे हे हॉटेलचे साहित्य व माल आणण्यासाठी गेलेले होते. गणेश हॉटेलवर होता. सायंकाळी शिंदे हॉटेलमध्ये आले असताना त्यांना गणेश तसेच हॉटेलसमोर लावलेली दुचाकी दिसली नाही.
त्यामुळे त्यांनी हॉटेलचे ड्रावर पाहिले असता ते तुटलेले दिसल्याने त्यांनी हॉटेलमागे जाऊन घराची पाहणी केली. घरचे कुलूप तुटलेले होते. दरम्यान, घराची व हॉटेलची पाहणी केली असता कामगार गणेश हा हॉटेलमधील रोख रक्कम, घरातील मोबाइलसह आदी साहित्य आणि दुचाकी घेऊन फरार झाल्याचे दिसून आले.