– रमेश जाधव रांजणी -2019 साली झालेल्या शिरूर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात टिकेची झोड उठवणारे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी अढळरावांच्या विरोधात राजकीय राळ उठवली होती. राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात बांदल यांचे योगदान होते. बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणातून बांदल जामिनावरून घरी परतले आहेत. ज्यांच्यावर त्यांनी निवडणुकीत जहरी टीका केली ते माजी खासदार आढळराव पाटील पहिल्यांदा बांदल यांची विचारपूस करायला आणि भेट घेण्यास घरी गेले. ज्यांच्यासाठी मी आढळराव पाटील यांच्या विरोधात वैर पत्करले त्यांनी डुंकूनही माझ्याकडे पाहिले नाही. आढळराव पाटील यांनी मात्र माझी खुशाली विचारली. यापुढील काळात आढळराव पाटील यांच्यासाठीच आपण काम करू असे अप्रत्यक्ष सुतोवाच मंगलदास बांदल यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात बांदल राजकीय मैदानात पुन्हा शड्डू ठोकणार असल्याचे संकेत यानिमित्ताने दिल्याने शिरूर लोकसभा मतदार संघातील 2024 च्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यांच्यासाठी काम केले, त्यांनी पाठ फिरवली ज्यांच्यासाठी आपण मनापासून काम केले त्यांनी मात्र आपल्याकडे पाठ फिरवल्याचे शल्य बांदल यांच्या मनात घर करून राहिले आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे शल्य त्यांनी बोलून दाखवले. भविष्यात कोणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणातून मी बाजूला जाणार नसल्याचा निर्धार देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आढळराव पाटील यांना केलेल्या विरोधाची बांदल यांना जाणीव झाल्याचे दिसून येते. आढळराव हे माणसातील माणूस आहेत. पराभव पत्करावा लागला तरी ते कार्यरत आहेत. लोकांच्या सुख-दुःखात आवर्जून जातात या बांदल यांच्या वक्तव्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात बांदल आढळराव यांना राजकीय साथ देण्याचे संकेतच त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.