वाघोली -पाणी व रस्त्याच्या प्रश्नासाठी वाघोलीतील नागरिकांनी महापालिका कार्यालयासमोर जनआंदोलन केले. आंदोलनासाठी सोसायटीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षानुवर्षे रखडलेल्या वाघोलीतील समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याने अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी विरोधी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनादरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या समजावून घेत रस्ता व पाणी संदर्भात लवकरच बैठक घेऊन समस्यांबाबत चर्चा करून उपाय केले जातील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पीएमआरडीएकडून आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. पीएमआरडीए बांधकाम परवानग्यांचे शुल्क गोळा करून वाघोलीकडे दुर्लक्ष करीत आहे. तर वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश होऊन 20 महिन्यांचा कालावधी झाला असताना कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे वाघोलीतील सोसायटी धारकांच्या वतीने वाघोली महापालिका कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले. महापालिका व पीएमआरडीए एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत असल्याने अधिकाऱ्याचा विरोध करून घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सकाळी आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या संख्येने वाघोलीतील सोसायटीधारक व काही ग्रामस्थ उपस्थित होते. आंदोलन कार्यालयासमोरील मोकळ्या जागेमध्ये करण्यात येणार होते. मात्र, महापालिकेने गेट बंद केल्याने गेटसमोरच अंतर्गत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. वाघोलीच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करूनही गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलकांनी पुन्हा जनआंदोलन केले. टीम वाघोली अगेन्स्ट करप्शन व सोसायटी धारकांच्या वतीने वाघोलीत भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या. दुपारनंतर महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, सहायक आयुक्त नामदेव बजबळकर हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले व आंदोलनकर्त्यांच्या बाजू ऐकून घेतल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा करून लवकरच पाणी व रस्त्याबाबत बैठक लावून चर्चेद्वारे उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. समस्यांचे पत्र महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी उपसरपंच मंदाकिनी जाधवराव, अनिल मिश्रा, मनसेचे प्रकाश जमधडे, बाळासाहेब सातव आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “त्यांच्या’कडून केवळ कारवाईत धन्यता पुणे मनपात वाघोलीचा समावेश झाल्यानंतर वाघोलीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गेले 20 महिन्यांत प्रशासकीय अधिकारी व वाघोली ग्रामस्थ यांच्यात एक बैठक झाली आहे. तीही अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याने वादग्रस्त ठरली. याउलट वाघोली येथे अनधिकृत बांधकाम याच्यावर पीएमआरडीए यांच्याकडून तर होर्डिंग, प्लॅस्टिकचा वापर याबाबतीत मनपाकडून कारवाई झाली आहे. पण विकासकामांच्या बाबतीत उदासीनता वारंवार पाहायला मिळाली आहे. पाणी व रस्त्याच्या प्रश्नांसाठी वाघोलीतील नागरिकांनी वाघोली महापालिका कार्यालयासमोर जन आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित झाले असले तरीही प्रशासनाकडे वाघोलीतील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. -रामभाऊ दाभाडे,माजी सदस्य जिल्हा परिषद