राजगुरुनगर – राजगुरुनगर ही खेड तालुक्याची राजधानी, चाकण हे इकॉनॉमिकल हब-आर्थिक शहर आहे आणि आळंदी ही तालुक्याची सांस्कृतिक ओळख आहे त्यामुळे देशाच्या नकाशावर खेड तालुक्याचे नाव झळकत आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले. राजगुरुनगर येथे जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड पटांगणात शनिवारी (दि. 17) आयोजित करण्यात अली होती. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. या स्पर्धेला महाराष्ट्र केसरी शरीफ मुलाणी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, अभिनेत्री अदिती येवले, अभिनेत्री कांचन शिंदे, मिस्टर अलोम्पिया कृष्णा चव्हाण, मिस्टर इंडिया शुभम शेवाळे, मिस्टर युनिव्हर्सल आहिर दहसल यांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे संचालक रामदास धनवटे, अश्विनी पाचारणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मनपाचे नगरसेवक धीरज गाठे, प्रवीण बोऱ्हाडे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. शुभम गाडगे, रवी पाचारणे, नितीन चौधरी, नरेंद्र वाळुंज, बंटी बागल, मयूर मोहिते, विकास वाळुंज, राहुल गवारे, गणेश सांडभोर, संतोष खामकर, संतोष भांगे, योगेश पवार, बबन होले, राजकुमार राऊत यांच्यासह जिल्ह्यातील स्पर्धक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहिते पाटील म्हणाले, राज्यात खेड तालुक्याचे स्थान अग्रणी आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकर, संत ज्ञानेश्वर महाराज, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत निमगावचा खंडेराया, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ, साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ, सरन्यायाधीश चंद्रचूड या ख्यातनाम व्यक्ती खेड तालुक्यातील असल्याने राज्यात व देशात तालुक्याचा लौकिक आहे. शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा तालुका जिल्ह्यात पुढे आहे. तालुक्याची ओळख जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. माझे भाग्य आहे की मला या तालुक्याचे नेतृत्व करणायची संधी मिळाली आहे. अनेक सांस्कृतिक चळवळी खेड तालुक्यात झाल्या आहेत. खेड तालुक्याचा विकास मी केला असा दावा मी करत नाही; मात्र विकास करण्याचा प्रयत्न मी निश्चित केला आहे. काम करताना पक्ष मला आडवा येत नाही. कोणाच्या टीका टिपण्णीला महत्व देत नाही. खेड तालुक्याच्या विकासासाठी जो योगदान देतो त्या कार्यकर्त्याला मी मोठे महत्व देतो. समाजाला जेव्हा जो आवडतो त्याला समाज स्वीकारतो. या स्पर्धेचे आयोजन प्रवीण बोऱ्हाडे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. शुभम गाडगे, रवी पाचारणे, नितीन चौधरी यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी तर शुभम गाडगे यांनी आभार मानले. तोसिफ मोमीन राजगुरूनगर “श्री’ या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत राजगुरूनगर “श्री’चा किताब तोसिफ मोमीन याने जिंकला, ‘बेस्ट रनरअप’ चा किताब दिव्यांक आरू तर ‘बेस्ट पोस्टर’ चा किताब शुभम भोईटे यांनी जिंकला. स्पर्धेचे परीक्षण नंदू कळमकर, दिलीप धुमाळ, महेश गणगे, मयूरेश मेहेर, राजेश वाईकर आदीने केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमातील बेली डान्सने सर्वांचे लक्ष वेधले.