अवसरी/मंचर – आंबेगाव तालुक्यातील काही भागांत रविवारी सायंकाळी अवकाळी तुरळक पाऊस झाल्याने शेती पिकांवर रोगराई पडून पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका तरकारी पिकांना बसणार आहे. चार-पाच दिवस असेच वातावरण राहिल्यास पिकांवर रोगराई पडून पिके खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी बटाटे काढण्याचे काम सुरू आहे तर कांदा चाळीतून कांदा पिशव्यात भरण्याचे काम सुरू असल्यामुळे या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. आंबेगावच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द,गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी टावरेवाडी भागात रविवारी दुपारनंतर ढगाळ व पावसाचे वातावरण तयार होऊन तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या या गावांमधील शेतकऱ्यांचे बटाटा, भुईमूग, काढणी सुरू आहे. तसेच बदलत्या हवामानाने कांदा व इतर पिकावर रोगराई पसरण्याची शक्यता असून अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी पिकांना मोठा फटका बसणार आहे. वीट भट्टी मालकांच्या विटा भाजून तयार आहेत; परंतु रविवारी अचानक तुरळक पाऊस सुरू झाल्याने वीटभट्टी मालकांची पळापळ सुरू झाली होती. भवानीनगरात रात्री बरसला भवानीनगर – भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरात रविवारी (दि. 11) सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर रात्री पावसाने सुरुवात केली. त्यामुळे इंदापूर बारामती रस्त्यावरील वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, लहरी वातावरणामुळे नागरिक साथीच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत.