आळंदी -सध्या थंडीचा जोर वाढल्याने शहरातील सर्वच जीम, तालीममध्ये व्यायामप्रेमींची संख्या वाढत आहे. आळंदी शहरात जवळपास 17 जीम असून 3 तालीम आहेत. यामध्ये हजारो युवक-युवती व्यायाम करताना दिसत आहेत. व्यायाम हा आरोग्यासाठी बारा महिने करणे चांगले आहे; मात्र थंडीच्या दिवसांत लोकांची पाऊले जीमकडे वळताना दिसतात. थंडीमध्ये भूक वाढते, पचनक्रिया चांगली होते. वजन वाढविण्यासाठी हा ऋतु चांगला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तसेच या काळात व्यायामानंतरची रिकव्हरी देखील लवकर होत असते. आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये बाकी ऋतूपेक्षा जास्त वेळ व्यायाम करता येतो. थंडीमुळे घाम कमी येतो त्यामुळे थकवा येत नाही. बहुतांश लोक शरीरयष्टी आकर्षक बनविण्यासाठी जीममध्ये जात असतात. अशावेळी व्यायाम केल्यानंतर चांगली भूक लागते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वजन वाढविण्यासाठी आहारात कर्बोदके असलेली पदार्थ खायला हवीत. यामध्ये भात, केळी, ओट्स, भाकरी, दूध, ड्रायफ्रुट्स आदींचा समावेश असावा. जीममध्ये वर्षभर व्यायाम करणारे अनेकजण असतात; मात्र हिवाळ्यात ही संख्या वाढते. सध्या युनिक जीममध्ये 400पेक्षा अधिकजण व्यायामासाठी येत आहेत. -प्रशांत घुंडरे, राष्ट्रीय खेळाडू