पुणे – खरेदीचा बहाणा करुन दुकानदाराचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला वसईच्या जंगलात सोडले. या अपहरणकर्त्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. कैलासराम सोहनलाल जाट (वय 35 , रा. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गोविंद (सर्व रा. राजस्थान) यांचा शोध सुरू आहे. प्रेमसंबंधातून हे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादी यांचे मांजरी येथे दुकान आहे.
23 नोव्हेंबर रोजी रात्री तिघे जण दुकानात आले. खरेदीचा बहाणा करुन त्यांनी मारहाण करत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते. वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटेच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे आढळले. त्यानंतर पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले.