लोणी काळभोर -पुणे-सोलापूर महामार्गावर दोन चारचाकी, दुचाकी आणि कंटेनर या चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयासमोर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रमजान गुलाब शेख (वय 50, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आकांक्षा भोसले (रा. उरुळी कांचन, ता. हवेली), सुनील भुजबळ (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) व अन्य एक (नाव समजू शकले नाही) यांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमजान शेख हे त्यांच्या पत्नीसोबत हडपसर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी चालले होते. तर आकांक्षा भोसले या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त चालल्या होत्या. दोन्ही गाड्या पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने एका पाठोपाठ चालल्या होत्या. आकांक्षा भोसले या गाडी चालवत असताना, त्यांची गाडी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर वस्तीच्या परिसरात राजलक्ष्मी कार्यालयासमोर आली. त्यावेळी आकांक्षा ओव्हरटेक करीत असताना, त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे दोन्ही गाड्यांची धडक होऊन, गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या. त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याचा दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्या. रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या दुचाकी आणि कंटेनरला दोन्ही गाड्यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात सुनील भुजबळ यांची दुचाकीचा चक्काचूर झाली आहे. हा अपघात इतका विचित्र होता की, पुण्याच्या दिशेने जाताना दोन कारचा अपघात झाला; मात्र दोन्ही कार एकमेकांत अडकल्याने रस्त्याचा दुभाजक ओलांडून सोलापूरकडील रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी व कंटेनरला धडक दिली. मात्र सुदैवाने यावेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाताना एकही वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. महामार्गाची सुरक्षा वाऱ्यावरच पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या झाल्या असून बऱ्याच ठिकाणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साइडपट्ट्या, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.