डिंभे – श्रीक्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण क रण्यासाठी भोरगिरी (ता. खेड) आणि निगडाळे (ता. आंबेगाव) येथील 0.287 हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे. राखीव वन क्षेत्राअंतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक 130 (सी. नं. 201-क्षेत्र 0.084 हेक्टर) निगडाळे येथील गट क्रमांक 244 (सी. नं. 200 ए-क्षेत्र 0.168, 0.020 व 0.015 हेक्टर) अशी एकूण 0.287 हेक्टर वनजमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वळतीकरणास मान्यता देताना पुढील अटी व शर्तीचे राहणार आहेत. प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उपवनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे पालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांच्या वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हा मान्यता आदेश एक वर्षापर्यंत वैध राहणार असल्याचे रा. य. पाटील पाटील यांनी कळवले आहे.