वाल्हे -महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडले असून राज्यात सुडाच राजकारण सुरू असल्याची खंत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केला आहे. वाल्हे (ता. पुरंदर) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. वाल्हे येथे सेवानिवृत्त प्राचार्य संतोष ढवळे यांनी लिहिलेल्या “आम्ही वाल्हेकर’ या पुस्तकांचे प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी, साहित्यिक रावसाहेब पवार, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, उपसरपंच अंजली कुमठेकर, सूर्यकांत भुजबळ, सिद्राम भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, अशोक बरकडे, उद्योजक चेतन शहा, पी. एस. जाधव, व्हि. एश. सोमवंशी, ऍड. फत्तेसिंग पवार, छाया शहा, अनिल भुजबळ, प्रा. संतोष नवले, विक्रमसिंह भोसले, दादासाहेब राऊत आदर्श सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण उपस्थित होते. सबनीस म्हणाले की, वाल्हे गावाला ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपतींच्या मुलीचे हे जहागिरीतील गाव. याच गावाने स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर दिले. स्वतंत्र संग्रामात भूमिगत चळवळने याच ठिकाणी जोर धरला होता. तर अनेक भूमिगत असणारे क्रांतिकारक याच ठिकाणी असायचे. अशा या ऐतिहासिक परंपरा असलेल्या वाल्हे गावाबद्दल “आम्ही वाल्हेकर’ या पुस्तकातून संतोष ढवळे यांनी माहिती दिली आहे. वाल्हे येथील पुढील पिढ्यान-पिढ्या ऐतिहासिक ठेवा जपणारे ठरणार आहे. वाल्हे गावातील जनता जातीय सलोख्याने एकत्र राहत असून या गावाचा आदर्श सर्व राज्यातील गावाने घ्यावा. यामुळे देश एकसंघ राहील, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक लेखक, माजी प्रा. संतोष ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुमठेकर यांनी तर सरपंच अमोल खवले यांनी आभार मानले. लोकशाहीत विरोधक आवश्यक केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही सत्तेचे वेड लागले आहेत. लोकशाहीत विरोधक आवश्यक आहे. हे सरकारला अजूनही लक्षात आलेले नाही. सध्या विरोधक हाच शत्रू आहे, या विचारप्रक्रियेवर आधारित, राजकीय सत्ता बळकावण्याचे काम सुरू आहे. ते पुढे म्हणाले, भाजप आता, अटलबिहारींचा वारसा चालवताना दिसत नाही. आणि कॉंग्रेस आता महात्मा गांधींचा वारसा पाळताना दिसत नाही;’ असे ठाम मत श्रीपाल सबनीस यांनी मांडले.