प्रभात वत्तसेवा वाल्हे – रक्षाबंधन अगदी काही दिवसांवरच आले असून त्यासाठी बहिणींकडून आपल्या भावाला राखी पाठविण्याची ओढ लागली आहे. बहिणीच्या या प्रेमाचा मान राखत पोस्ट कार्यालयाकडून राखीसाठी खास पाकीट तयार केले आहे. त्यावर राखीचे आकर्षक चित्र आणि राखीचा शुभ संदेश लिहिला आहे. पाकीटमध्ये २० ग्रॅम वजनापर्यंतची राखी बसणार आहे. विशेष म्हणजे, राखीचे पाकीट पाठविण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था असणार आहे. ‘लाडक्या बहिणी’ ची राखी भावाला वेळेत मिळावी यासाठी, विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे यंदा भावाला लाडक्या बहिणीची राखी वेळेत मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवार (दि.९) रोजी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर बहीण गावखेड्यातून शहरी भागात आणि शहरातून दुसऱ्या शहरात अथवा गावी राखी पाठवितात. याकरिता पोस्ट विभागाने विशेष पाकीट तयार केले आहे.बारामती विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये हे राखी पॉकेट उपलब्ध आहे. कित्येकदा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाला बहिणीची राखी मिळते. मात्र, यंदा ही चूक होऊ नये यासाठी पोस्ट विभागाने लगेच राखीचे पाकीट पोहच करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती वाल्हे पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर हनुमंत गुरवे यांनी दिली. राखीसाठी वॉटरप्रुफ लिफाफा.. पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफआहे. जर तुम्ही राखी पोस्टच्या माध्यमातून तुमच्या भावासाठी पार्सल पाठवत असाल तर तो लिफाफा व्यवस्थित तुमच्या भावापर्यंत पोहोचेल. लिफाफा तुमच्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून खरेदी करू शकाल. पावसाळा असल्यामुळे राखीचे पार्सल ओले होण्याची भीतीही असतेच; मात्र लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील.