आळंदी – नववर्षानिमित्त रविवारी (दि. 1) लाखभर भाविकांनी तीर्थक्षेत्र आळंदीला भेट देऊन माऊलींचे मुखदर्शन घेतले. तर 50 हजांराहून अधिक भाविकांनी माऊलींचे संजीवन समाधी स्पर्श दर्शन घेतले. माऊलींचे दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली.
माऊली मंदिरात रविवारी नित्याचे पवमान अभिषेक, नैवेद्य, धुपारती, भजन, नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साह ओसंडून वाहत होता.
भाविकांनी इंद्रायणी घाट परिसर गजबजून गेला होता. मंदिर परिसरातील हार, फुले, प्रसाद, ग्रंथ, टाळ-पखवाज दुकानांमध्ये खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
नववर्षानिमित्त माऊलींचे दर्शनासाठी गर्दी होणार यादृष्टीने दर्शनबारीचे नियोजन केले होते. यावेळी दुपारी 1 हजार तर सायंकाळी 500 भाविकांना मंदिरात भोजन प्रसाद वाटप करण्यात आले, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.