प्रभात वृत्तसेवा सारोळा – भोर तालुक्यातील निगडे गावात सरपंचांचे पती किशोर लक्ष्मण बारणे यांच्यावर दोन आरोपींनी लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ रोजी किशोर बारणे हे आपल्या चारचाकी गाडीतून घराकडे जात असताना, प्रथमेश ज्ञानेश्वर चिकणे आणि ज्ञानेश्वर आनंदा चिकणे या दोन आरोपींनी त्यांना मोटारसायकलवरून अडवले. यावेळी आरोपी ज्ञानेश्वर चिकणे याने हातातील कोयत्याने बारणे यांच्या गाडीवर हल्ला केला. बारणे यांनी जाब विचारला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या गंभीर परिस्थितीत ज्ञानेश्वर चिकणे याने थेट कोयता बारणे यांच्या दिशेने फेकून मारला. सुदैवाने बारणे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला आणि ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या जीवघेण्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या बारणे यांनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. किशोर बारणे हे विद्यमान सरपंच यांचे पती असल्यामुळे या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. बारणे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि या हल्ल्यामागे कोणीतरी ‘मास्टरमाईंड’ असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मदने करत आहेत. या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या घटनेमागील खरे कारण आणि सूत्रधार कोण आहेत, हे स्पष्ट होईल.