राजगुरुनगर : खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सांडभोरवाडी गावाजवळ पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या खेड घाट रस्त्यावर मंगळवारी (दि. २३) रात्री ११:४५ वाजता खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत ४४ लाख ९ हजार २०० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला साठा दोन वाहनांसह जप्त केला. या प्रकरणी तुषार शांताराम बंदावणे (वय ३८, रा. बंदावणेशिवार, ता. खेड) आणि संदेश राजाराम ढमाले (रा. ढमालेशिवार, ता. खेड) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 14 LB 4615) च्या अज्ञात चालकाविरुद्धही तक्रार नोंदवली आहे. खेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्ती पथकाला तपासणी दरम्यान टाटा कंटेनर (MH 14 LB 2001) आणि महिंद्रा बोलेरो पिकअपमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला वाहतूक होत असल्याचे आढळले. हा साठा संदेश ढमाले याच्या मालकीच्या कंटेनरमध्ये ठेवला होता, तर तुषार बंदावणे आणि पिकअप चालक यांनी संगनमताने वाहतूक केली. जप्त केलेला माल पुढीलप्रमाणे : – व्ही-1 तंबाखू: ३,३०० पाकिटे (किंमत ७२,६०० रुपये) – केशरयुक्त विमल पान मसाला: ३,९६० पाकिटे, १८ गोण्यांमध्ये (किंमत ७,८४,०८० रुपये) – लाल रंगाचा विमल पान मसाला: ४०० पाकिटे (किंमत ४८,००० रुपये) – हिरव्या रंगाचा विमल पान मसाला: १,३०० पाकिटे (किंमत ६,११,००० रुपये) – निळ्या रंगाचा विमल पान मसाला: ४१६ पाकिटे (किंमत ७७,७९२ रुपये) – व्ही-1 विग तंबाखू: १,२०० पाकिटे (किंमत ३६,००० रुपये) – व्ही-1 तंबाखू (निळी): ४१६ पाकिटे (किंमत १३,७२८ रुपये) – लाल विमल पान मसाला: ४१६ पाकिटे (किंमत १२,४८० रुपये) – व्ही-1 तंबाखू: ६६० पाकिटे (किंमत १४,५20 रुपये) – क्यूँल्सिनेड क्ले: ५० गोण्या (किंमत ३९,००० रुपये) – टाटा कंटेनर (MH 14 LB 2001): अंदाजे किंमत २२,००,००० रुपये – महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 14 LB 4615): अंदाजे किंमत ५,००,००० रुपये एकूण जप्त मालाची किंमत: ४४,०९,२०० रुपये महाराष्ट्र अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार, गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक आणि विक्रीवर बंदी आहे. या पदार्थांमुळे मुखाचा कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. यामुळे आरोपींवर अन्न सुरक्षा कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सिसोदे तपास करत आहेत. जप्त माल आणि वाहने ताब्यात घेण्यात आली असून, अज्ञात पिकअप चालकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध मोठे यश मानले जात आहे.