चिंबळी – श्री नागेश्वर महाराज उपबाजारात शेवगा, गवार, भेंडीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली असून बटाटा, लसून यांच्या भावात घट झाली आहे. तसेच पालेभाज्यांचे दर स्थिर होते. बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून शेवग्याच्या दरात सतत वाढ होत आहे. मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात या आठवड्यात 2 हजार 297 क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत शेवग्याच्या भावात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात आठ हजार रुपये प्रतिक्विंटल शेवगा होता. तर या आठवड्यात नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल शेवग्याचा दर होता. गवारीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत 750 रुपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात गवारीचा भाव प्रतिक्विंटल चार हजार रुपये होता. तर, मागील आठवड्यात 3250 रुपये होता. भेंडीच्या भावात प्रतिक्विंटल 250 रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलोचा भाव 80 ते शंभर रुपये झाला आहे. वांग्याच्या भावात प्रतिक्विंटल 250 रुपयांनी वाढ झाली असून मटारच्या दरातही प्रतिक्विंटल 150 रुपयांनी वाढ झाली आहे.