अवसरी -राज्य शासनाने विद्युत वितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या खासगीकरणास विरोध दर्शविण्यासाठी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले होते, त्यामुळे कृषीपंपधारक, घरगुती वीज ग्राहकांवर संपांचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी बुधवारी (दि. 4) सकाळीच घरगुती ग्राहकांच्या विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, तर गावाच्या नळ पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, निरगुडसर, लोणी धामणी या भागात विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी, कृषी मित्र घरगुती ग्राहकांना सेवा देत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात 15 ते 20 गावे आहेत. सध्या दिवसा उन्हाचा तडाका जाणू लागल्याने शेतकरी कांदा, मिरची, ढोबळी, वांगी, फ्लॉवर, जनावरांचे खाद्य असलेले मका, कडवळ, बाजरी, गवत ही पिके पाण्याअभावी सुकू लागले आहे. शेतकरी कृषी पंपाच्या साह्याने पिकांना पाणी देणे चालू केले आहे; परंतु मंगळवारी रात्रीपासून विजेचा लपंडाव चालू झाला आहे. अवसरी येथील वितरण विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी मंगळवारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून गेल्याने शेतकरी, घरगुती ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली. संपाचा परिणाम सरकारी बॅंका, पतसंस्था, पीठ गिरणी, शेतीला पाणी पुरवठा करणारे मोटर यांच्यावर झाला, खाजगीकरण करू नये अशी मागणी अधिकारी कर्मचारी वर्गाने केली आहे.