– दीपक येडवे वीसगाव खोरे -सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या भावात 50 रुपयांनी वाढ केल्याने 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा भाव आता 1103 रुपये झाला आहे. गॅस सिलिंडरधारकांना सरकारकडून दिली जाणारी सबसीडी या आधीच काढून घेण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ केल्याने भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिलांनी आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली चुलीची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी देऊन ग्राहकांना त्यांचे आरोग्य चांगले राहावे, श्वसनविकार त्रास होऊ नये, चुलीवरील स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाचा वापर केला जात असल्याने महिलांना सरपणातून निघणाऱ्या धुरापासून मुक्ती तसेच जंगलातील वृक्षतोड यावर आळा बसावा याकरीता सरकारने गॅस कनेक्शन सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले; पण गॅसच्या वाढत्या भावाने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडल्याने हा शंभरीतील गॅसजोड आता नाकापेक्षा मोती जड झाला आहे. शासन घरगुती गॅसवर सबसिडी देत होते आता तीही बंद करण्यात आली आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील बहुतांशी प्रदेश डोंगराळ असल्याने अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. या परिसरात पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती केली जाते. या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. या जनावरांच्या शेणापासून तयार केलेली गोवऱ्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. महिला चुलीचा वापर करून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना इंधन जमा करावी लागणारी खटपट बंद झाली होती. गोरगरिबांची भाकरी भाजणारे गॅसचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य, महिला जेरीस आल्या आहेत. केंद्र सरकारने गॅसच्या अवाढव्य वाढवलेल्या किमतीमुळे गरीब त्रासले आहेत. सर्वसाधारण कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीला एकाच वेळी ही रक्कम भरणे परवडत नसल्याने गॅस कनेक्शन असूनही अनेक ग्राहकांना सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा, सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे. हे. रॉकेल मिळणे बंद झाले आहे. 350 रुपयांचा सिलिंडर अकराशेवर जाऊन पोहोचला. वाढत्या महागाईमुळे पैसे कुठून आणायचे? त्यापेक्षा आपली चुलंच बरी. – शारदा शिवतरे, गृहिणी, उत्रौली (ता. भोर)