जांबूत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय शालेय विद्यार्थी रोहन विलास बोंबे याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवार (दि. ०७) रोजी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. रोहन याच्या मोठ्या भावाचे ऋतिक याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यासोबतच कुटुंबाला नवीन घर बांधण्यासाठी वैयक्तिक पातळीवर मदत करणार असल्याचे वळसे पाटील यांनी घोषित केली. कोणतेही राजकारण न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी (२ नोव्हेंबर) घडलेल्या या हृदयद्रावक हल्ल्यात रोहन आणि त्याची पाच वर्षीय बहीण शिवन्या बोंबे यांचा समावेश असलेल्या कुटुंबीयांचे वयक्तिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनावर हल्ला करून आंदोलन केले होते. वळसे पाटील यांनी सांत्वनपर भेटीदरम्यान बोलताना, “मी या कुटुंबाचा एक सदस्य आहे. रोहन याच्या निधनाचे दुःख मलाही आहे. या परिवाराचे पालकत्व मी स्वीकारत असून ऋतिक याच्या शिक्षणापासून ते नवीन घर बांधण्यापर्यंतची जबाबदारी मी घेत आहे,” असे स्पष्ट केले. या परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत बोलताना वळसे पाटील यांनी सांगितले की, “आपल्या परिसरात बिबट्यांची संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मागील आठवड्यात मी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली आणि सखोल चर्चा केली.” यानंतर बिबट्याच्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, बिबटे जेरबंद करण्यासाठी जवळपास ८०० पिंजरे तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे पिंजरे बिबट्यांच्या प्रवण क्षेत्रात रचनात्मक ठेवण्यास सुरुवात झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. वळसे पाटील यांनी वनविभागाला स्पष्ट सूचना देताना म्हटले की, “या हल्ल्यात यापुढे एकही नागरिक मृत्यू पावणार नाही, याची काळजी घ्यावी. शंभर किंवा दोनशे नव्हे, तर सर्वच बिबट्यांना रेस्क्यू टीम आणि इतर माध्यमांतून जेरबंद करून गुजरातमधील वनतारा येथे तात्काळ पाठविले जाईल. या उपाययोजनांसाठी वनविभागाने गांभीर्याने ठोस भूमिका घ्यावी.” या पद्धतीचे काम आता वेगाने सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी मांडलेल्या मागणीनुसार, वस्त्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांना तात्काळ मोकळीक देण्याचा आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. “दोन दिवसांत अधिकारी येऊन प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करतील. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी सहकार्य करावे,” अशी विनंती त्यांनी केली. या भेटीदरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, विवेक वळसे पाटील, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, रविंद्र करंजखेले, युवा नेते राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, बाळकृष्ण कड, संपत पानमंद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण असतानाही नेत्यांच्या या पावलामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.