मंचर – कांद्याचे विक्री दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर 500 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना साहाय्य करावे, अशी मागणी किसान सभेने मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहून केली आहे, अशी माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान 600 रुपये अनुदानाबरोबरच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपायांबाबत आग्रह धरण्यात आला आहे. बांगलादेशाने कांदा आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लादल्याने या देशात होणारी मोठी कांदा निर्यात अशक्य झाली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर याबाबत काही पावले उचलली गेल्यास बांगलादेशामध्ये होणारी कांदा निर्यात पुन्हा एकदा व्यवहार्य बनविता येईल. केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. फिलिपिन्स, थायलंडसारख्या देशांमध्ये कांद्याचे भाव खूप उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. या देशांबरोबर संवाद साधून देशातील कांदा रास्त दरामध्ये या देशांना पाठविता येईल. यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशभरातील इतर राज्यांना संपर्क करून देशांतर्गत बिगर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा पोहचविण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. या सर्व उपाययोजना करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केली आहे. पाकिस्तान-दुबईला होणारी निर्यात ठप्प पाकिस्तानाबरोबर बिघडलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानला होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे. पाकिस्तानला सध्या दुबईमार्गे कांदा जात आहे. दुबईबरोबर भारताचा व्यापार, काही कारणांमुळे तणावग्रस्त झाला आहे. दुबईला यामुळे होणारी कांदा निर्यात बंद आहे. राज्यकर्त्या पक्षाच्या भूमिकांचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे. राजकीय शिष्टाईच्या माध्यमातून दुबईला पुन्हा कांदा निर्यात सुरू झाल्यास कांद्याचे देशांतर्गत दर स्थिर करण्यात मोठी मदत होणार आहे. शिवाय कांदा निर्यातीबाबतच्या सातत्याच्या धरसोडीच्या धोरणामुळे आपले जागतिक कांदा ग्राहक दुखावले गेले आहेत.