शिक्रापूर -विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्तीनजीक ऊस तोड सुरु असताना बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र, वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकाणी जात शेताची पाहणी करीत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली. विठ्ठलवाडी येथील भोसेवस्तीनजीक महादेव गवारे यांच्या शेतात ऊस तोड सुरु असताना बिबट्याचे पिल्ले दिसल्याचे ऊस तोड कामगारांनी सांगितले. ही माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कुंभार, प्रशांत गवारे यांनी धाव घेतली. यावेळी वन अधिकारी व निसर्ग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात पाहणी केली. शेतात कोठेही बिबट्याचे पिल्ले अथवा बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळले नाहीत. यावेळी अधिकारी व निसर्ग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बिबट्यांबाबत जनजागृती करत योग्य खबरदारीच्या सूचना देखील केल्या आहेत.