– विजय शिंदे वडापुरी, -बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे व भारतीय जनता पक्षाचे नेते यांचे इंदापूर तालुक्यात दौरे वाढू लागले आहेत. एकीकडे भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षनिरीक्षक राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, माजी मंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे, चित्रा वाघ यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बारामती लोकसभा पिंजून काढत आहेत. नुकताच इंदापूर तालुक्यात बोरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी माजी मंत्री राम शिंदे व हर्षवर्धन पाटील यांनी “बारामती लोकसभा जिंकायची’ हा निर्धार केला. त्याच दिवशी इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या वडापुरी गणातील अकरा गावांना 2 मार्च रोजी भेटी देऊन समस्या जाणून घेणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे व पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे यांनी दिली. इंदापूरमध्ये भरणेंवर जबाबदारी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले होते. पण शरद पवारांनी निर्माण केलेला बारामतीचा बालेकिल्ला जिंकता आला नाही. बदललेल्या समीकरणानुसार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याचा फायदा उठवण्यासाठी व इंदापूर तालुक्यातील सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, 2019 साली झालेल्या लोकसभेचे मताधिक्य टिकवण्याची जबाबदारी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर राहील.