केडगाव – केडगाव (ता. दौंड) येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीप्रकरणी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव (ता. दौंड) येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक भेट दिल्यानंतर विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना दिसून आले. या पथकाचे अधिकारी किसन भुजबळ यांनी या प्रकरणात शिक्षकांना जबाबदार धरीत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ यांच्या फिर्यादीवरून केंद्र संचालक जालिंदर नारायण काटे, रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, कविता काशिद, शाम गोरगल, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोडनवर या नऊ शिक्षकांसह दोन विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र बोर्ड आणि इतर परीक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे केडगाव आणि परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.