शिरूर : मौजे पिंपरखेड (ता. शिरूर) येथे १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जनतेच्या रोषाला उधाण आले. या घटनेच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर रोजी विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले तरी आंदोलकांनी ‘पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,’ असा ठाम पवित्रा घेतला. परिणामी, हे आंदोलन तब्बल २२ तास चालले, ज्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अजित रघूनाथ पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, देवदत्त जयवंतराव निकम (नागापूर), अरुण गोविंदराव गिरे (मेंगडेवाडी), नरेश सिताराम ढोमे (पिंपरखेड), शरद रोहीदास बोबे (पिंपरखेड), सचिन बाळू बोंबे (पिंपरखेड), भोलानाथ लक्ष्मण पडवळ (सविंदणे), किरण शांताराम ढोबळे (पारगाव), दिलीप नथू वाळुंज (लोणी), रवी जनार्दन वळसे (निरगुडसर), पूजा निलेश वळसे (निरगुडसर), निलेश भिवसेन वळसे (निरगुडसर), सुरेश लक्ष्मण भोर (अवसरी खुर्द भोरवाडी), सुभाष पोकळे (कवठे येमाई), दामू अण्णा घोडे (टाकळी हाजी), विकास विलास गायकवाड (पोंदेवाडी), कुणाल शिवाजी बाणखेले (मंचर), विशाल जालिंदर वाबळे (खडकी), धोडिंभाउ भोर (वळती), संपत बाळासाहेब बाणखेले, रमेश शिवाजी येवले (गंगापूर खुर्द), नित्यानंद भिवसेन येवले (गंगापूर खुर्द), दत्तात्रय दशरथ गांजाळे (मंचर), जयेश भालेराव (मंचर), प्रभाकर गोपाळ बांगर (मंचर), वनाजी बजरंग बांगर (पिंपळगाव), अजित शरद चव्हाण (अवसरी बु), दीपक गंगाराम पोखरकर, भाउसाहेब सांवत (पारगाव तर्फे खेड), राजेंद्र विठ्ठल दाभाडे (पिंपरखेड), विकास देवराम वरे (पिंपरखेड), सौरभ उर्फ वैभव संभाजी पोखरकर (वडगाव काशिंबेग) यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्ते व पिंपरखेड ग्रामस्थांवर बेकायदेशीर जमाव जमवून महामार्गावरील वाहने अडवणे, लोकसेवकांच्या आदेशांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक कार्यात अडथळा आणणे याबद्दल भारतीय दंड संहिता कलम १४३, १४५, १४९, ३४१, ३५३ इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अहवालानुसार, आंदोलकांनी महामार्गावरील दोन्ही लेन बंद करून वाहतूक पूर्णपणे थांबवली होती. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेनंतर परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वारंवार जीवितहानी होत असताना शासन व प्रशासन निष्क्रिय आहे. उलट, पीडितांच्या आवाजाला गुन्हेगारीचा ठपका लावून दडपशाही सुरू केली जात आहे.” स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, सरकार व वन विभागाने बिबट्या बंदोबस्तात अपयश मिळवले असून, निष्क्रियतेचा निषेध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून लोकशाही मूल्ये धुळीला मिळवली जात आहेत. देवदत्त निकम यांनी सांगितले, “हे आंदोलन जनतेच्या भावनांचे प्रतीक होते. पालकमंत्री व वनमंत्र्यांनी घटनास्थळी येऊन ठोस उपाययोजना कराव्यात, ही मागणी होती. गुन्हा दाखल करून सरकारने अन्याय केला आहे. जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न बाजूला ठेवून आंदोलनकर्त्यांना आरोपी बनवले गेले.” या घटनेमुळे आंबेगाव-शिरूर परिसरात राजकीय वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात या प्रकरणाचे स्थानिक राजकारणावर परिणाम उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे.