सविंदणे – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने बाजार समितीवर 15 डिसेंबरपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांनी काढले असून, बाजार समितीवर सहायक निबंधक शिरूर शंकर कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीवरील सभापती व संचालकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता होती, तर भाजपचे दोन संचालक निवडून आले होते. या आदेशात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियमान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आणि शासनाकडील पारीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने आदेश देण्यात येत आहेत की, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर, या बाजार समितीचे सर्व समिती सदस्य 15 डिसेंबर 2022 पासून सदस्य म्हणून पद धारण करण्याचे बंद होऊन ती सर्व पदे रिकामी झाली आहेत, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर, या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्षात संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा या आदेशाच्या तारखेपासून पुढील 6 महिने यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर, या बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी एस. एस. कुंभार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला मुदत संपली महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमानुसार शासनास प्राप्त अधिकारांचा वापर करून कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास 15 जून 2022 पासून 6 महिन्यांची मुदत संपेपर्यंत म्हणजेच दि. 14 डिसेंबर 2022 पर्यंत किंवा निवडणुका होऊन नवीन संचालक मंडळ प्रस्थापित होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती.