मंचर -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) परिसरातील हिंदू बांधवांनी मंचर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मंगळवारी (दि. 3) निषेध आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याचे खासदार अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन केले. यावेळेस अजित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र जाव्हाड, अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण परिसर धर्मवीर संभाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. याप्रसंगी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.मताच्या राजकारणासाठी पवार आणि त्यांचे सहकारी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी केला. आंदोलनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बाणखेले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, भाजपचे संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, सुशांत थोरात, स्वप्ना पिंगळे, गणेश बाणखेले, रामदास जाधव, सुदर्शन खानदेशे, जागृती महाजन उपस्थित होते.