शिरूर : गेल्या काही दिवसांपासून शिरूर नगरपरिषदेकडून शहरातील घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याऐवजी बेकायदेशीरपणे कचरा जाळण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून, नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याचे असे जाळणे पर्यावरण संरक्षण कायद्याच्या स्पष्टपणे विरोधात आहे. कचरा व्यवस्थापनासाठी ठरवलेल्या शास्त्रोक्त पद्धतींची अंमलबजावणी करण्याऐवजी नगरपरिषद बेकायदेशीर मार्गाने कचरा जाळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना श्वसनाच्या समस्या, अॅलर्जी, फुफ्फुसाच्या आजारांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. कायद्याचा भंग आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा : पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचा कचरा जाळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही शिरूर नगरपरिषदेकडून या कायद्याचा भंग करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. मनसेचा इशारा : जर या प्रकरणाची त्वरित चौकशी करून नगरपरिषदेस योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडले नाही, तर मनसे ची लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, मनसेचे शिरूर सचिव रवि लेंडे यांनी दिला आहे.