मंचर -घोडेगाव (ता आंबेगाव) येथील श्री हरिचंद्र महादेव संस्थानच्या मंदिरातील दानपेटीमध्ये पुरातन दुर्मिळ असे अकराव्या शतकातील 3.5 ग्रॅमचे सोन्याचे नाणे मिळाले आहे. महाशिवरात्री उत्सवानंतर अध्यक्ष प्रशांत काळे पाटील, कोषाध्यक्ष राजेश काळे पाटील, कार्याध्यक्ष किरण घोडेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब आनंदराव व विश्वस्त पंचांसमोर दानपेटी उघडण्यात आली. या नाण्याचा इंटरनेटवर फोटो टाकला असता जगभरात व्हेनिशियन गोल्ड डुकाट्स या नावाने ते प्रसिद्ध आहे. इटलीतील व्हेनिस हे स्वतंत्र राष्ट्र होते. व्हेनेशियन राजाने 1140 मध्ये येशू ख्रिस्ताची आकृती आणि लेख असलेले सोन्याची नाणी तयार केली आणि त्यावर “हे ईश्वरा, तू राज्य करत असलेली ही मुद्रा तुलाच समर्पित होऊ दे’ असे लिहिले. सुरुवातीला सोन्याची व चांदीची नाणी तयार केली; परंतु सोन्याची नाणी अतिशय लोकप्रिय झाल्याने डुकाट हे नाव केवळ सोन्याच्या नाण्याशी जोडले गेले. दानपेटीत आलेले अकराव्या शतकातील हे व्हेनेशियन नाणे त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे कुतुहलाचा विषय ठरले आहे. इजिप्त, अलेक्झांडरिया मार्गे भारतात आली नाणी पुढील 700 वर्ष ही नाणी अपरिवर्तित व्यवहारात राहिली. नाण्याचे प्रमाण वजन आकार सोन्याची शुद्धता आणि डिझाईनमुळे जगातील राष्ट्र परस्परांबरोबर व्यवहार करण्यासाठी या नाण्यांचा उपयोग करू लागले. भारतात ही नाणी मध्ययुगीन काळात आली. भारतात 1981 साली कर्नाटकच्या पुरातत्व विभागाला अशी नाणी सापडल्याची नोंद आहे. पूर्व व पश्चिम जगात व्यापाराचा प्रचंड विस्तार झाला. इजिप्त व अलेक्झांडरिया या मार्गे ही नाणी भारतात आली. भारतातील शासन राज्यकर्त्यांनी ही नाणी विद्वानांचा सन्मान करण्यासाठी व पुरस्कारासाठी खरेदी केली. ख्रिश्चन धर्मीयांत या नाण्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. श्री हरिचंद्र महादेव मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून अखंड पाण्यात असते म्हणून त्यास पंचमहाभूतातील जललिंग या नावाने ओळखले जाते. श्री भीमाशंकरला येणारे, तसेच परदेशातील अनेक नागरिक या मंदिरास भेट देत असतात. श्रद्धेपोटी दानासोबत आपली समस्या लिहून दानपेटीत टाकतात. अशाच एखाद्या भक्ताने हे दुर्मिळ सोन्याचे नाणे टाकले असावे. – प्रशांत काळे, अध्यक्ष, श्री हरिचंद्र महादेव संस्थान, घोडेगाव