मंचर – आंबेगाव तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 18) शांततेत मतदान पार पडले.सायंकाळपर्यंत 76 टक्के मतदान झाल्याची माहिती घोडेगाव तहसील कार्यालयातून देण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, चांडोली बुद्रुक, कळंब, पारगाव तर्फे खेड,मेंगडेवाडी, धामणी, भावडी, नारोडी, गोहे खुर्द, निघोटवाडी, रांजणी येथील ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, मतदानाचा हक्क आढळराव पाटील यांनी बजावला. कळंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे, वसंतराव भालेराव आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मेंगडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे याची पत्नी सुषमा गिरे या उमेदवार आहेत. तेथे अरुण गिरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. घोडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती कैलास काळे, मावळत्या सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला .