पालिका हा मिळकत कर कधी वसूल करणार? -सजग नागरीक मंच पुणे : महापालिका आर्थिक झळ सोसून मिळकतर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवत आहे. विशेष म्हणजे याच वेळी शहरातील सरकारी, निमसरकारी मिळकतींचा तब्बल ३५५ कोटींचा कर थकला असून महापालिका हा कर कधी आणि कसा वसूल करणार असा सवाल सजग नागरीक मंचाने उपस्थित केला आहे. तसेच प्रशासनाने तातडीनं या वसुलीवर लक्ष केंद्रीत केल्यास अभय योजनेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल असा दावा मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. या थकबाकीदारांमध्ये संरक्षण,पीएमपी, राष्ट्रीयकृत बॅंकाचाही समावेश आहे. पालिकेच्या मिळकतकराची थकबाकी जवळपास १३ हजार कोटींवर गेल्याचे सांगत पालिकेने मिळकतकर अभय योजना सुरू केली आहे. त्यात, मिळकतकराच्या थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. १५ जानेवारी पर्यंत या योजनेची मुदत आहे. संरक्षणकडे सर्वाधिक शासकीय थकबाकीदारांमध्ये सर्वाधिक १२० कोटींची थकबाकी संरक्षण विभागाची आहे. पीएमपीएमएलकडे १२० कोटी, महावितरणकडे ६८ कोटी , बी एस एन एलकडे १४ कोटी, म्हाडा १४ कोटी, राष्ट्रीयिकृत बॅंकांकडे १० कोटी, सीडब्यूपीआरएसकडे ७ कोटी , विविध राज्य सरकारी खात्यांकडे १० कोटींची थकबाकी आहे याशिवाय अनेक विभागांकडे थकबाकी असून त्यांच्याकडून ती दोन दोन वर्षांनी भरली जाते. त्याचवेळी या विभागांकडे पालिकेचे देणे असल्यास त्याबाबत तगादा लावला जातो मात्र, पालिकेने वसुलीसाठी नोटीसा दिल्यानंतर त्याला केराची टोपली दाखविली जाते विशेष कक्ष उभारा मिळकतकर विभागाकडील माहितीनुसार १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणारे १६६७ थकबाकीदार असून त्यांच्याकडे ७७३७ ही सर्वाधिक थकबाकी आहे. यापैकी १३३६ मोबाईल टाॅवरअसून त्यांची रक्कम दाव्यांमध्ये अडकली असून ती रक्कम ४३७६ कोटी आहे. ही प्रकरणे कोर्टात प्रलंबित असून त्याचे दावे वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळे विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून सर्व दावे निकली लावण्यासाठी प्रयत्न केल्यास पालिकेस किमान २ हजार कोटींचे उत्पन्न मिळेल. ही बाब लक्षात घेवून तातडीने हा कक्ष स्थापन करण्याची मागणीही मंचाने केली आहे.