पुणे, दि. 14 – पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (पुणे बोर्ड) कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे शालार्थ आयडीचे 215 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. यातील तब्बल 171 प्रस्तावांमध्ये भरमसाठ त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांना संधी देण्यात आलेली होती. मात्र, आवश्यक ती कागदपत्रेच सादर करण्यात आली नाहीत. अखेर हे प्रस्ताव अमान्य करुन फेटाळून लावण्यात आले आहेत. शालार्थ आयडीच मिळणार नसल्याने संबंधित शिक्षकांच्या वेतनाचा तिढा कायम राहणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाली की वेतन सुरू करण्यासाठी शालार्थ आयडी घ्यावेच लागतात. यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पुणे बोर्डाकडे प्रस्ताव दाखल होत असतात. बोर्डाच्या प्रभारी अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ यांनी स्वत: शालार्थ आयडीचे प्रस्ताव व त्यातील सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली. पुण्यातून 167 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यातील 32 प्रस्तावांची पडताळणी अद्याप बाकी आहे. पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या शिक्षकभरतीतील 7 आणि न्यायालयाने निकाल दिलेली 4 असे 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. नाशिकमधील 48 प्रस्ताव दाखल झाले होते. यातील केवळ 1 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. उर्वरित सर्व प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलेले आहेत. शालार्थ आयडीसाठी अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत. संच मान्यता नसणे, शिक्षक भरतीची जाहीरात प्रसिद्ध केलेली नसणे, ना-हरकत प्रमाणपत्र नसणे, उमेदवारांची यादी व गुणदान तक्ता न जोडणे, जात वैधता प्रमाणपत्र नसणे, नियुक्ती आदेश व संस्थेचे ठराव नसणे, विभागीय शिक्षण उपसंचालकांचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र नसणे, स्वाक्षरी व शिक्के नसणे आदी विविध प्रकारच्या त्रुटी प्रस्तावांमध्ये काढण्यात आल्या. या त्रुटींची पुर्तता करण्याबाबत पुणे बोर्डाकडून पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र त्यावर योग्य ती कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत.