Pune : जीबीएस रूग्णांवर माफकदरात उपचार करावेत

पुणे : शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे रुग्ण वाढत असून या आजारासाठी त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांची भेट घेतली.
नागरीकांमध्ये या आजारा विषयी जनजागृती करणे गरजेचे असून, आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे, तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली.
मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महापालिकेने चाचण्यांची सुविधा करावी
शहरात जीबीएस आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरात या साथीचे रुग्ण मोठया प्रमाणात आहेत. या आजाराच्या निदानासाठीच्या चाचण्या महाग आहेत. ही बाब लक्षात घेता संशयित रूग्णांच्या चाचण्यांचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी केली आहे. नागपूरे यांनी या मागणीचे पत्र महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डाॅ. निना बोरुडे यांना दिले आहे.
अतिरिक्त आयुक्त आज करणार पहाणी
नांदेड गावाच्या परिसरात प्रामुख्याने या आजाराचे सर्वाधिक संशयित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभागासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. या भागातील पाणी पुरवठयाच्या व्यवस्थेची उद्या (गुरूवारी) पहाणी करणार आहेत. सकाळी दहा वाजता नांदेड गावात ही पहाणी केली जाणार आहे. तर तातडीची बाब म्हणून या गावातील पाणी शुध्द करण्यासाठीची यंत्रणा तसेच आसपासचे नाले आणि ड्रेनेजची तातडीनं सफाई करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.





