प्रत्यार्पण प्रक्रियेला येणार गती पुणे – कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा अखेर समोर आला आहे. भारतातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ब्रिटन उच्चायुक्तालयाकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नीलेश घायवळ याने गायवळ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते. त्याच्यावर खून, खंडणी, संघटित गुन्हेगारीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याने चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळविला असून, त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सूरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी भारतातील ब्रिटन उच्चायुक्तालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पोलिसांच्या या पत्राला आता ब्रिटन उच्चायुक्तालयाकडून ईमेलद्वारे उत्तर मिळाले आहे. त्यानुसार घायवळ हा ब्रिटनमध्येच असून, तो व्हिजिटर व्हिसावर आल्याचे त्यांनी कळविले आहे. घायवळचा व्हिसा फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे. याबाबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, नीलेश घायवळ हा लंडनमध्ये असल्याचे ब्रिटन उच्चायुक्तालयाकडून अधिकृतपणे कळविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्याला देशात आणण्यात येईल.