Pune : गे-डेटींग अॅपवरुन लुटणारी टोळी गजाआड

पुणे : ऑनलाइन मैत्री आणि तिही नको त्या संबंधात असेत तर लुटले गेल्यानंतरही व्यक्ती कोठेही तक्रार करीत नाहीत. ही बाब लक्षात घेत आत्तापर्यंत पन्नास पेक्षा अधिक जणांना आपल्या जाळ्यात खेचणाऱ्या एका टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. वाजीद रज्जाक उर्फ लालसाहब शेख (वय १९ ), महेबुब ऊर्फ गौस जावेद शेख (वय २०), श्रीनिवास उर्फ शिनु व्यकप्पा नायक (वय २२), सोहेल गफुर शेख (वय २४, सर्व रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. गे-डेटींग अॅपवरुन या टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता.
गे डेटींग अॅपवरून झालेल्या ओळखीतून पिंपरी परिसरात राहणार्या एका तरुणाला चौघांनी (दि. १८ मार्च) मंगळवार पेठेतील आरटीओ चौक परिसरात मारहाण करीत लुटले होते. डेबीट कार्ड, मोबाइल आणि गाडीची चावी काढून घेत, डेबीट कार्डचा पिन क्रमांक घेऊन एटीएमधून ९ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर चौघा आरोपींनी तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाने धाडस दाखवत केलेल्या तक्रारीमुळे ही टोळी गजाआड करता आली.
अशा ठोकल्या बेड्या..
आरोपींनी फिर्यादी संबंधीत तरुणाचा मोबाइल फॉरमॅट केल्याने अॅपद्वारे संपर्क केलेली माहिती डिलीट झाली होती. शाहरुख टॉप नाव हाच काय तपासाचा दुआ पोलिसांंकडे होता. उपनिरीक्षक मोहन काळे, अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी त्यांचा मोर्चा मंगळवार पेठेकडे वळविला, त्यावेळी त्यांना महेबुब याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तिघा साथीदारांबरोबर असे गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने केली.
अशी करतात लुट…
चौघे आरोपी एकाच लुटारु टोळीतील आहेत. यातील महेबुब आणि सोहेल हे दोघे सुत्रधार आहेत. महेबुब याच्या मोबाइलमध्ये त्या अॅपवर शाहरूख टॉप नावाने खाते आहे. यावर फोटो देखील महेबुबचा आहे. मात्र, समोरच्या व्यक्तीशी चॅटींग सोहेल करतो. अॅपच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर सावज हेरल्याानंतर त्याला प्रथम महेबुब भेटतो. तो भेटत असताना काही वेळानंतर वाहीद, श्रीनिवास आणि सोहेल येतात. सावज आणि महेबुब या दोघांना ते धमकावतात. त्याचवेळी महेबुब तेथून पळ काढल्याचे नाटक करतो. इतर तिघे सावज तरुणाला ब्लॅकमेल करीत आम्ही तुझे फोटो, व्हिडीओ तयार केले असल्याचे सांगून ब्लॅकमेल करतात. त्यात नंतर महेबुब देखील सामिल होते. सावजाने पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण करीत लुटतात.





