pune ganeshotsv : तीव्र आवाजाच्या डीजेवर पोलिसांचा अंकुश
pune ganeshotsv :

नियमभंग केल्यास थेट जप्ती; गणेशोत्सव बैठकीत पोलीस आयुक्तांचा इशारा
pune ganeshotsv :– गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यास पोलीस प्रशासनाचा विरोध नसला, तरी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कर्णकर्कश डीजेला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविल्यास थेट डीजे जप्त केला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी उत्सवावरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्याची मागणी केली.
मात्र, ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. डीजे, प्लाझा, तसेच मिड प्रेशरसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांवर निर्बंध कायम राहतील, असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निर्धारित नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
आवाजाची मर्यादा निश्चित होणार
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार आहे. डीजेमध्ये किती बेस आणि किती टॉप वापरता येतील, याबाबतही नियमांच्या चौकटीत चर्चा करून आवश्यक मर्यादा निश्चित करण्यात येणार आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज होणार नाही, याची जबाबदारी संबंधित मंडळांवर राहणार आहे.
नियमभंग केल्यास थेट कारवाई
डीजेच्या तीव्र आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाची समस्या निर्माण होते. त्यामुळे यंदा उत्सवाच्या सुरुवातीपासूनच पोलिसांकडून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजविल्यास संबंधित मंडळावर कारवाई करण्याबरोबरच डीजे थेट जप्त केला जाईल.
उत्साहासोबत नियमांचेही भान राखा
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





