पुणे – गणेशोत्सव काळात शहरातील मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन यंदा पुणेकरांना ऑनलाइनच घ्यावे लागणार आहे. राज्य शासनाने याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले.
राज्य शासनाकडून करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाट व मागील वर्षी गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्णांची संख्या लक्षात घेऊन यंदाही मागील वर्षीप्रमाणे गणेशोत्सव साधेपणानेच साजरे करण्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. या सूचनांमध्ये गणेश भक्तांना प्रत्यक्ष येऊन दर्शन घ्यायचे असल्यास मंडळांनी भाविकांसाठी शारीरिक अंतराचे नियम पाळावेत; तसेच स्वच्छता नियम (मास्क, सॅनिटाझर) वापरावेत, असे आदेश दिले होते.
मात्र, या आदेशाने गणेश मंडळांच्या बाहेर भाविकांच्या रांगा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने या मार्गदर्शक सूचनेत बदल करत गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मांडवात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केला आहे. त्याऐवजी मंडळांनी केवळ ऑनलाइन दर्शन अथवा माध्यमाद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.