Pune : फुरसुंगी, उरुळी देवाची गावाची नवी नगरपालिका

पुणे-पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची एकत्रित नवी नगरपालिका करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी घेतला. याबाबतचे तांत्रिक आदेश येत्या दोन आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील मालमत्ता कर व मूलभूत सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह या दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक उपस्थित होते. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच, नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकासकामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील नागरिकांनी आपली नगरपालिका राज्यातील एक सर्वोत्कृष्ट अशी नगरपालिका ठरावी यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच पुणे पालिकेने या दोन्ही गावांत नागरी सुविधांशी संबंधित सुरू केलेल्या प्रकल्प, योजनामंध्ये सहकार्य देणे अपेक्षित आहे.
यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. पुणे महापालिकेमध्ये 2017 मध्ये 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांचा समावेश होता. या दोन्ही गावांची मिळून सुमारे अडीच लाख इतकी लोकसंख्या आहे, यामुळे स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा असल्याचे सांगण्यात आले.





