PUNE: फरार आरपीएफ हवालदाराच्या मुसक्या आवळल्या

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याला मंगळवारी अटक करण्यात आली. मागील दोन महिने तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्याच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी कमलेश तिवारी (रा. मूळ उत्तरप्रदेश) आणि एका महिलेला नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, पवार फरार होता. तेव्हापासून लोहमार्ग पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, तो पुण्यातील घरी येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून पवारला अटक केली.
… असे आहे प्रकरण
परराज्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासह पळून पुण्यात आली होती. पवार याने त्यांना हेरुन स्वत:च्या संस्थेत दाखल केले. तेथे तिच्यावर तब्बल पाच वेळा अत्याचार केले. तसेच छत्तीसगडवरुन तिच्या नातेवाईकांकडून सहा हजार रुपये ऑनलाइन घेतले. दरम्यान, घरी परत गेल्यावर मुलीने पालकांना अत्याचाराची घटना सांगितली. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी पाठपुरावा केल्यावर पुणे लोहमार्ग पोलिसांत पवार याच्यावर पॉक्सो, अॅट्रोसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मनसेचे नेते वसंत मोरे यांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
पवार याच्या पत्नीच्या नावावर सद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी आहे. येथे रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलींना हेरण्यासाठी पवारने काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. तो बेकायदा या मुलींना संस्थेमध्ये ठेवायचा. तेथे मुलींवर अत्याचार करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जायचे, असे सूत्रांनी सांगितले.
“अनिल पवार याला आज अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर अधिक माहिती मिळेल.” – तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग





