पुणे : केंद्र शासनाचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, शहरभरात दीडशेहून ठिकाणी दिली जाणारी नागरिकांसाठीची मोफत वाय-फाय सेवा बंद करण्यात आली आहे. “स्मार्ट सिटी’ कंपनीने ही सेवा देण्यासाठी “रेलटेल’ कंपनीसोबत करार केला होता. त्याची मुदत संपल्याने तसेच स्मार्ट सिटीने ही सेवा पालिकेकडे हस्तांतरित केल्याने आता नवीन कंपनीची नेमणूक होईपर्यंत नागरिकांना ही सेवा मिळणार नसल्याची स्थिती आहे. महापालिकेत आलेल्या नागरिकांना वाय-फायचा वापर करता येत नसल्याने त्यांच्याकडून तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे चौकशी केली असता, ही बाब समोर आली आहे. शहरातील वर्दळीची ठिकणे, उद्याने, पार्किंग, महत्त्वाची बसस्थानके तसेच पर्यटनस्थळी मोफत वाय-फायची सुविधा दिली जात होती. येथे नागरिकांना “ओटीपी’ प्रणालीद्वारे ५० एमबीपर्यंत इंटरनेट वापरता येत होते. विशेषत: शासकीय योजनांचे अर्ज तसेच आॅनलाइन शासकीय सुविधांचा उपयोग घेता यावा, या उद्देशाने ही सुविधा होती. तर, मनपा मुख्य इमारतीमध्ये या सेवेत इंटरनेट वापर तसेच वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते. मुख्य इमारतीमध्ये सर्वाधिक फटका आपली दैनंदिन कामे घेऊन पुणेकर मनपा मुख्य इमारतीत येतात. येथे काही ठराविक मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क चालते. अशा वेळी नागरिकांना वाय-फायद्वारे इंटरनेटचा वापर करता येत होता. मात्र, आता ही सेवा बंद झाल्याने नागरिकांना फोन काॅल आणि इंटरनेटसाठी मनपा इमारतीबाहेर यावे लागते. काही तातडीची कामे आॅनलाईइन करायची असल्यासही मुख्य इमारतीच्या बाहेर जावे लागत आहे. मनपा कर्मचारीही मोफत वाय-फाय सेवेचा वापर करत असत. आता त्यांचीही गैरसोय होत आहे. स्मार्ट सिटीकडून मोफत वाय-फाय सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. ही सेवा देणाऱ्या कंपनीचा करार संपला आहे. त्यामुळे ही सेवा बंद असून “महाप्रीत’कडे हे काम देण्यात आले आहे. तसेच या प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येइल. – गणेश सोनुणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी