Pune: विद्यार्थिनींसाठीची मोफत शिक्षण योजना फेल?

पुणे – राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यात यंत्रणा अपयशी ठरली असल्याचे स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड्स या संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. अंमलबजावणीवरून शासकीय यंत्रणा आणि शिक्षण संस्थांत समन्वयाचा अभाव असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या २०० विद्यार्थिनींचे स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड्स या संस्थेने नुकतेच काही प्रश्नांद्वारे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ६२.५ टक्के मुलींना योजनेबाबत कोणतीही माहितीच मिळालेली नव्हती. काहींना अपुरी माहिती मिळाली, तर केवळ ४६ टक्के विद्यार्थिनींनी शासकीय पातळीवरून थोडीफार माहिती मिळाल्याचे सांगितले.
८५ टक्के मुलींनी सांगितले, की महाविद्यालय प्रशासनाने त्यांना १०० टक्के शुल्क माफ करण्याच्या प्रक्रियेबाबत काहीच मार्गदर्शन केले नाही. ७९.५ टक्के मुलींनी सांगितले, की त्यांनी शासकीय पोर्टलवर अर्ज केला होता. शासकीय यंत्रणा आणि शिक्षण संस्थांकडून योग्य पद्धतीने योजनेची माहिती प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनींपर्यंत पोहोचली नसल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.
दरम्यान, पात्र विद्यार्थिंनीनी मोफत शिक्षणासाठी शासकीय पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. काही अर्ज प्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळे मुलींना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याच्या टप्प्यावर शासन व शिक्षण संस्थांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे.
‘मुलींना मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस कृती करणे आवश्यक आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या प्रवेशावेळी थेट मोबदला किंवा शुल्क परतावा मिळावा, तसेच राज्य सरकारने प्रत्येक महाविद्यालयांना अशा योजनांची स्पष्ट प्रक्रिया मुलींना सांगणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.’- कुलदीप आंबेकर, संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड्स.
पालक संभ्रमात
सध्या दहावी-बारावीचे निकाल लागून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, तरीही या योजनेबाबत प्रशासन वा शैक्षणिक संस्था कोणतीही प्रसिद्धी करताना दिसत नाहीत. त्यामुळे या योजनेवरून पालक संभ्रमात आहेत. या योजनेबाबत महाविद्यालयांकडून योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे या योजनेच्या जनजागृतीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संस्थेकडून करण्यात आलेल्या मागण्या
- खासगी व अभिमत विद्यापीठांमध्ये योजनेचा लाभ मिळावा
- पदव्युत्तर कोर्सला योजनेचा लाभ मिळत नाही
- अर्जाची प्रक्रिया सुटसुटीत असावी
- योजनेचा तत्काळ लाभ प्रवेशावेळीच विद्यार्थिनींना मिळावा
- निवडक अभ्यासक्रमांऐवजी सर्वच कोर्सला लाभ मिळावा





