पुणे – सदनिकेच्या व्यवहारात 2 कोटी 40 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गौतम पाषाणकर यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी फिर्यादीस नोकरांकरवी मारहाण करत त्यांचा उजवा पायही फ्रॅक्चर केला आहे. कर्जदारांच्या तगाद्यामुळे वाहन चालकाकडे चिठ्ठी ठेऊन घर सोडून गेल्याने गौतम पाषाणकर मध्यंतरी चर्चेत आले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना शोधून काढले होते.
नरेंद्र पंडितराव पाटील (42, रा. पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणी दीप पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींनी मे. प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन खराडी येथील सी बिल्डींगमध्ये पी-101 व 102 मधील फ्लॅटची किंमत रुपये 2 कोटी 87 लाख ठरवून तसा लेखी करारनामा केला होता. पण, त्यानंतर नरेंद्र पाटील यांच्याकडून 2 कोटी 40 लाख रुपये घेत सदर मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त केले नाही.
तसेच सदनिकेचे खरेदीखत नरेंद्र पाटील यांच्या नावावर न करता फ्लॅट नं पी 102 हा सुशिल झोरर तर्फे कुलमुखत्यार म्हणून मनिषा गोदर (रा. रेंज हिल्स पुणे) व फ्लॅट नं पी 101 हा
गणेश शिंदे (रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) यांच्या नावावर करुन दिला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे करत आहेत.
नरेंद्र पाटील यांनी कोणतीही सदनिका बुक केलेली नाही. ते कर्ज काढण्यासाठी आमच्याकडून कागदपत्रे घेऊन गेले होते. त्यांनी दिलेला धनादेश अद्यापही आमच्याकडे असून, तो वटवलेला नाही. पूनावाला ग्रुपच्या नावाचा वापर करुन ते अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग करत असतात.
– कपिल पाषाणकर, गौतम पाषाणकर यांचा मुलगा