Pune : चार लघुपटांना मिळणार मिती लघुपट शिष्यवृत्ती

पुणे : गेली चार वर्षे मिती फिल्म सोसायटीतर्फे राष्ट्रीय पातळीवर मिती लघुपट महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी डिसेंबरमध्ये पर्यावरण या विषयावरील ५ वा मिती लघुपट आणि माहितीपट महोत्सव आयोजित केला आहे.
नवीन लघुपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी मिती फिल्म सोसायटी चार लघुपटांना २५ हजार रुपयांची मिती शिष्यवृत्ती योजना जाहीर करत असल्याची माहिती मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते मिलिंद लेले, उपाध्यक्ष, अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी मिती फिल्म सोसायटीचे सचिव आमोद खळदकर आणि खजिनदार अजिंक्य खरे उपस्थित होते. चित्रपट क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ घडावेत यासाठी मिती फिल्म सोसायटी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते.
लघुपट महोत्सव हा त्यापैकी एक उपक्रम आहे, असे लेले यांनी सांगितले. शिष्यवृत्तीमुळे लघुपट निर्मितीसाठी नवनवीन कल्पना घेऊन स्पर्धक यात सहभागी होतील, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. शिष्यवृत्तीसाठी ३० ही वयोमर्यादा असून इच्छुकांनी ३० जून २०२५ पूर्वी आपल्या संहिता सादर करणे आवश्यक आहे. तसेच लघुपट सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२५ ही आहे.




