Pune : माजी नगरसेवकांकडून अद्यापही लेटरहेडचा अनाधिकृत वापर

पुणे : महापालिकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत लेटरहेडचा वापर अजूनही माजी नगरसेवक करीत असल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाने त्याविरोधात आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. हा प्रशासकीय प्रक्रियेत केला जाणार अनाधिकृत हस्तक्षेप असल्याचे पक्षाचे पुणे युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमित म्हस्के यांनी म्हटलं आहे.
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ तीन वर्षांपूर्वीच संपुष्टात आलेला आहे. मात्र, तरीही काही माजी नगरसेवक पुणे महापालिकेच्या अधिकृत लेटरहेडचा वापर शिफारस पत्रे, खासगी माहितीच्या विनंत्या करण्यासाठी आणि इतर कारणांसाठी वापरत आहेत. यातून महाराष्ट्र महापालिका कायदा, १९४९च्या कलम ३० आणि ३१ अंतर्गत असलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत आहे.
अशा प्रकारे, माजी पदाधिकाऱ्यांद्वारे पालिकेच्या संस्थात्मक साधनांचा गैरवापर केल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे, प्रशासकीय प्रक्रियेत अनधिकृत हस्तक्षेप होत आहे. पुणे महापालिकेची प्रतिमाही धोक्यात येत आहे.
त्यामुळे पालिकेने सदर माजी नगरसेवकांना लेटर हेड, शिफारस पत्रे, किंवा पालिकेचे इतर कोणतेही प्रतीक वापरण्यास तातडीने बंदी घालवी आणि संबंधित व्यक्तीं विरुद्ध गैरवापराच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी. शिवाय सर्व विभागांना याबाबत मार्गदर्शक परिपत्रक जारी करावे, अशी मागणी आप पक्षाकडून करण्यात आली आहे.





