पुणे : वनपाल, वनरक्षकास लाख रुपयांची लाच घेताना ऍन्टिकरप्शने पकडले रंगेहाथ

पुणे – लाकूडफाटा नेणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनक्षेत्रपाल व वनरक्षकाला रंगेहाथ पकडले.
वनपाल सागर भोसले (वय 34) आणि वनरक्षक संजय पाव्हणे (वय 45) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिरूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय आवारात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे लाकूडफाटा नेताना वनरक्षक व वनपाल यांनी ही गाडी पकडली. त्यामध्ये सरपण वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगून गाडीवर वन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दंड भरावा लागेल, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. गाडीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी तक्रारदारांकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी दि. 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यात दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदारांना पैसे देण्यासाठी बोलावण्यात आले.





