Pune : नऊ महिन्यांत पूर्ण होणार उड्डाणपूल; साधू वासवाणी पुलाचे पाडकाम अंतीम टप्प्यात

पुणे : कोरेगाव पार्क आणि लष्कर परिसराला जोडणारा ५० वर्षे जुन्या असलेल्या साधू वासवाणी पुलाच्या पाडकामातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे. या ठिकाणी असलेल्या आणखी २० झोपड्यांचे हडपसर येथील एसआरए योजनेत स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे कॅम्पच्या बाजूचा पूल वेगाने पाडण्यास सुरूवात झाली आहे. पूल पाडून नवीन पुलाचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, आधी रेल्वे लाइनवर असलेल्या या पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेकडून सलग ब्लाॅक मिळत नव्हता. तर, कॅम्पच्या बाजूला झोपडपट्टी असल्याने तो पाडता येत नव्हता. त्यामुळे महापालिकेने आधी कोरेगावपार्कच्या बाजूने जूना पूल पाडून आठ नवीन खांबाची उभारणीही पूर्ण केली आहे. असे असताना कॅम्पच्या बाजूच्या पाडकामासाठी हे काम रखडलेले होते.
त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने या पुलाखाली असलेल्या झोपडीधारकांना हडपसर एसआरए योजनेत घरे देण्यात आली आहेत. हे स्थलांतर अखेर पूर्ण झाले असल्याने बुधवार (दि.१२) पासून पूल पाडण्याच्या कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील पूल रेल्वेकडून पुढील काही दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ब्लाॅक नुसार रेल्वे वाहतूकीस अडथळा होणार नाही या पद्धतीने पाडला जाणार आहे.





