Pune Flood : शहरात पावसाळ्यात ५६ ठिकाणी अचानक उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा धोका कायम असणार आहे. या ठिकाणी पूरस्थिती रोखण्यासाठी पालिकेला दीर्घकालीन कामे करावी लागणार असून त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ही कामे यंदा पावसाळ्यापुर्वी करणे शक्य नसल्याने या सर्व ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांनी पाण्याचा निचरा करण्यासाठीची तात्पुरती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे. आयुक्तांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत सोमवारी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला यावेळी हे आदेश दिले आहेत. शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणारी १२० ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी केलेल्या कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला आहे. बैठकीत प्रशासनाने १२० ठिकाणांच्या कामाची माहिती सादर केली. त्यात,५६ ठिकाणी पावसाळयापुर्वी काम करणे शक्य नसल्याचा अहवाल दिला. ही कामे मोठी असून त्यात नवीन पावसाळी वाहिन्या विकसित करणे, नवीन चेंबर करणे तसेच जुन्या कमी क्षमतेच्या लहान वाहिन्या बदलणे, पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जाळे तयार करणे अशा कामांचा समावेश आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी तसेच कामासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त त्यामुळे यंदा पावसाळ्यापुर्वी ही कामे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या ठिकाणी तातडीनं पाणी निचरा करण्यासाठीची कामे तसेच पाणी निचरा करण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आदी उपाय योजना तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. उर्वरीत ६४ ठिकाणांची कामे पुढील महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रोज अहवाल द्या यावेळी पालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येणारी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची सफाई, पावसाळी चेंबरची सफाई या कामांचा आढावा घेत काम संथ गतीने सुरू असल्याचे तसेच काम अर्धवट असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच या पुढे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांनी कामांचा आढावा प्रत्येक आठवड्याच्या ऐवजी दररोज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.